सणासुदीच्या दिवसात मिठाईवरची उत्पादनाची आणि वापराची अंतिम तारीख गेली रजेवर

सणासुदीच्या दिवसात मिठाईवरची उत्पादनाची आणि वापराची अंतिम तारीख गेली रजेवर

अन्न व औषध प्रशासन विभागाने लक्ष देण्याची गरज

भद्रावती : संपूर्ण देश हा ऑगस्ट महिन्यापासून पारंपारिक सण उत्सव साजरा करीत असतो. सण उत्सव आले म्हणजे मिठाई ही शंभर टक्के आलीच, पण येणारी मिठाई ही दुकानातून येते आणि ती आपल्या आरोग्यास कितपत योग्य असेल यावर सुद्धा प्रश्नचिन्ह आहे. कारण दुकानात मिठाई विकत घेताना ती कधी तयार केली आहे, ती तयार केल्यापासून किती दिवस खाण्याकरिता योग्य राहील, आपण याची कधी विचारणा दुकानदाराला करत नाही. प्रत्येक वस्तूला एक एक्सपायरी डेट असतेच पण दुकानदार ग्राहकांच्या आरोग्याचा विचार न करता स्वतःला जास्तीत जास्त फायदा कसा मिळेल याकडे त्याचे लक्ष असते. एखादी कालबाह्य झालेली मिठाई किंवा खाद्यपदार्थ तो विकताना नागरिकांच्या आरोग्याचा जराही विचार करत नाही.

दुकानदार म्हणतो की, साहेब आम्ही रोज खाद्यपदार्थ किंवा मिठाई तयार करतो. ती रोजच विक्रीला जाते. मग दुकानदार मिठाई किंवा खाद्यपदार्थावर कालबाह्य तिथी का बरं लिहित नाही? मिठाईचा ट्रेवर मिठाईचे नाव, किंमत ही जशी ठळक अक्षरात लिहितात तसेच मिठाई तयार केल्याची तारीख आणि अंतिम वापराची तारीख का बरं लिहिली जात नाही. काही प्रसिद्ध दुकानात तर मिठाईचे नाव आणि किमतीच्या कार्डवर कालबाह्य तिथी असे लिहिले असते पण तिथे तारीखच लिहिलेली नाही आणि हास्यास्पद म्हणजे ते बनवलेले कार्ड हे लॅमिनेशन करून ठेवलेले दिसतात.

त्यामुळे नागरिकांना-ग्राहकांना आवाहन आहे की, मिठाई किंवा खाद्यपदार्थ विकत घेत असताना कृपया उत्पादनाची तारीख आणि अंतिम वापराची तारीख ज्या दुकानात लिहिलेली असेल त्याच दुकानातून विकत घ्यावी. ग्राहकांनी दुकानदाराला उत्पादनाची तारीख आणि अंतिम वापराची तारीख का लिहिली नाही? यावर प्रश्न विचारावे आणि तरी देखील दुकानदार दोन्ही तारीख लिहिण्यास नकार देत असेल किंवा वारंवार सांगून लिहीत नसेल तर त्याची तक्रार स्थानिक ग्राहक पंचायत किंवा अन्न औषध प्रशासनाकडे करावी.

अन्न व औषध प्रशासनाने अशा दुकानदारावर लगेच कारवाई करावी तसेच सणासुदीच्या दिवसात ज्यावेळी जास्तीत जास्त मिठाई व इतर खाद्यपदार्थ विकल्या जातात अशा दिवसात एक चम्मू तयार करून किंवा स्थानिक ग्राहक पंचायत ला संपर्क करून तेथील पदाधिकाऱ्यांच्या मदतीने संपूर्ण दुकानात तपासणी मोहीम राबवावी जेणेकरून ग्राहकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होणार नाही असी मागणी ग्राहक पंचायत भद्रावती अन्न व औषध प्रशासन विभाग, चंद्रपुर यांना या माध्यमातून करत आहे.

Comments