ऍड. मोरेश्वर टेमुर्डे म्हणजे राजकारणातील चिखलामध्ये फुललेले कमळ

ऍड. मोरेश्वर टेमुर्डे म्हणजे राजकारणातील चिखलामध्ये फुललेले कमळ

 रिटायर्ड चीफ मेट्रोपॉलिटन मॅजेस्ट्रेट सी. एल. थूल यांचे प्रतिपादन

भद्रावती : ॲड. मोरेश्वर टेमुर्डे यांचे नेतृत्व, कर्तृत्व, वक्तृत्व व कार्य महाराष्ट्राला दिशा देणारे आहे. त्यांची अध्यात्मावर श्रद्धा आहे. आमची १९६८ पासूनची मैत्री आहे. आम्ही ५२ वर्षापासून मैत्री कायम ठेवली आहे. मी त्यांना नेहमी म्हणत असतो की, तुम्ही राजकारणात आलेच कसे? तुम्ही राजकारणातील चिखलामध्ये फुललेले कमळ आहात असे प्रतिपादन रिटायर्ड चीफ मेट्रोपॉलिटन मॅजेस्टर सी. एल. थूल यांनी केले. ते  लोकनेते अॅड. मोरेश्वर टेमुर्डे यांच्या 81 व्या वाढदिवसानिमित्त स्थानिक श्री मंगल कार्यालयात  (5 ऑगस्टला) योद्धा संन्यासी स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय पालक- मित्र मंडळ भद्रावती आणि शहरातील विविध सामाजिक संस्थांद्वारे आयोजित नागरी सत्कार सोहळ्यात  "सहस्त्रचंद्रदर्शन सोहळ्यानिमित्त" कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. या प्रसंगी व्यासपीठावर सत्कारमूर्ती अॅड. मोरेश्वर टेमुर्डे व त्यांच्या अर्धांगिनी सौ. मायाताई टेमुर्डे, प्रमुख पाहुणे लातूरचे माजी आमदार तथा शेतकरी नेते पाशा पटेल, योद्धा संन्याशी स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय पालक मित्र मंडळाचे अध्यक्ष पुरुषोत्तम मत्ते यांची प्रमुख उपस्थिती होती.

 पुढे मार्गदर्शन करताना जस्टीस थूल यांनी सांगितले की, मोरेश्वर टेमुर्डे यांनी कधीही कुणाला दुखावलेलं मी पाहिलं नाही. त्यांनी कोणावरही अन्याय केला नाही. त्यांनी वकिली व्यवसाय करताना गावागावातील लोकांशी आणि शेतकऱ्यांची नाते जोडले. जनतेशी जनसंपर्क कायम ठेवला. त्यांच्या समस्यांचा पाठपुरावा केला. त्यांच्या मनात कायम स्थान निर्माण केलं. त्यामुळे जनतेनी त्यांना लोकनेते म्हणून मान्य केले आहे. त्यामुळे ते खऱ्या अर्थाने लोकनेते झाले. त्यांच्या विचारांची व मार्गदर्शनाची समाजाला आवश्यकता आहे. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर विषयाची चर्चा विधानसभेत सलग ४८ तास चालली. त्यावेळी ॲड. मोरेश्वर टेमुर्डे यांनी विधानसभेचे उपाध्यक्ष म्हणून कुठलाही अनुचित प्रकार घडू न देता अत्यंत कार्यकुशलतापूर्वक कामकाज पूर्ण करून आवश्यक ठराव पारित करून घेतला. यावरून त्यांच्या कार्यकुशलतेचा परिचय होतो. त्यांना उदंड आयुष्य लाभो अशा शुभेच्छा दिल्या.

 याप्रसंगी माजी आमदार तथा शेतकरी नेते पाशा पाटील म्हणाले की, टेमुर्डे यांचे कार्य मोठे आहे.
 त्यांचा होत असलेला नागरी सत्कार हा त्यांनी यापूर्वी केलेल्या चांगल्या कामाची पावती आहे. पाशा पटेल यांनी यावेळी वृक्षतोडीमुळे शास्त्रज्ञांनी दिलेल्या इशाऱ्याचा उल्लेख करताना सांगितले की, वृक्षतोडीमुळे पृथ्वीवरील तापमान सतत वाढत असल्याने 2050 नंतर सर्वत्र भयावह परिस्थिती निर्माण होणार असल्याने प्रत्येकाने वृक्ष लागवड व त्यांचे संवर्धन करावे. विशेषतः बांबूची लागवड करावी असे आवाहन त्यांनी केले. 

सत्काराला उत्तर देताना मोरेश्वर टेमुर्डे म्हणाले की, आजचा सत्कार हा माझा नसून सर्वसामान्य जनतेचा आणि उपस्थित बंधू भगिनींचा आहे. पद भुषविल्याने कोणी मोठा होत नाही.प्रथम मनुष्य बनून प्रत्येकाशी मानवतेने वागले पाहिजे. पैसे कमविण्यासाठी मी राजकारणात आलो नाही असे सांगून आता राजकारण व्यापार झाल्याची खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली. तसेच सहस्रचंद्र दर्शन सोहळ्याबद्दल सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी सुहासिनींनी त्यांना अक्षदा लावून ओवाळले. त्यांची लाडू तुला करण्यात आली. त्यांच्या जीवनावर आधारित एक सुंदर चित्रफित सादर करण्यात आली. तालुका व शहरातील विविध संस्था आणि सामाजिक संघटनांनी  त्यांचा सत्कार केला. या कार्यक्रमात माजी आमदार संजय धोटे, डॉ. रजनी हजारे, रवींद्र शिंदे, रमेश राजुरकर, अमन टेमुर्डे, जयंत टेमुर्डे, प्रा.अशोक पोफळे, प्राचार्य नामदेव उमाटे यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन डॉ ज्योती राखुंडे, आभार लक्ष्मण बोढाले यांनी केले.

Comments