विधानसभा निवडणुका शिवसेना स्वबळावरच लढणार- प्रशांत कदम

विधानसभा निवडणुका शिवसेना स्वबळावरच लढणार- प्रशांत कदम

 वरोरा : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये परिस्थिती पाहून काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आघाडी करण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. परंतु येणाऱ्या विधानसभा निवडणुका मात्र शिवसेना स्वबळावरच लढणार असे शिवसेनेचे चंद्रपूर जिल्हा संपर्कप्रमुख प्रशांत कदम यांनी वरोरा येथे पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना सांगितले.

 प्रशांत कदम हे शिवसेना पदाधिकाऱ्यांचे शपथपत्र लिहून घेण्यासाठी दोन दिवसाच्या दौऱ्यावर २४ जुलै रोजी वरोरा येथे आले होते. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मुकेश जीवतोडे यांच्या जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात शिवसेना पदाधिकारी, माजी जिल्हा परिषद सदस्य,माजी पंचायत समिती सदस्य,माजी नगरसेवक यांचा मेळावा घेण्यात आला.या प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे आणि स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या छायाचित्राचे  पूजन करून माल्यार्पण करण्यात आले  यानंतर पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देतांना प्रशांत कदम यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भूमिका ठामपणे मांडली. सन २०१९ मध्ये महाराष्ट्रातील जनतेने भाजपा-शिवसेना युतीला स्पष्ट कौल दिला असताना शिवसेनेने काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आघाडी केली.


 हा निर्णय योग्य होता का ? या प्रश्नावरचे उत्तर देताना प्रशांत कदम यांनी सावध पवित्रा घेत तो चुकल्याचे मान्य केले. परंतु आघाडीची सत्ता स्थापन होण्यापूर्वी भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेस सोबत सत्ता स्थापनेचे स्वप्न बघून पहाटे शपथविधी आटोपला होता याकडे त्यांनी लक्ष वेधले. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी कधीही काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जाणार नाही. तशी वेळ येईल तेव्हा दुकान बंद करेल असे म्हटले होते.

 याकडे प्रशांत कदम यांचे लक्ष वेधले असता त्यांनी असे निर्णय त्या-त्या वेळची परिस्थिती पाहून घेतले जातात असे सांगितले. शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार असेल तर मी तयार आहे असे म्हटले होते. मग एकनाथ शिंदे यांच्या रूपाने शिवसेनेचाच मुख्यमंत्री झाला असताना उद्धव ठाकरे शिंदे गटासोबत का जात नाही या प्रश्नाच्या उत्तरावर प्रशांत कदम यांनी हे एक षडयंत्र असून पुढे भाजपापासून शिवसेनेला फार मोठा धोका असल्यानेच उद्धव ठाकरे यांनी तो निर्णय बदलला असे म्हटले. राष्ट्रवादी काँग्रेस मुळे सेनेचे नुकसान झाले असा आरोप होत आहे. यावर बोलताना प्रशांत कदम यांनी याची स्पष्ट कबुली दिली. आणि नुकसान नव्हे तर राकाने शिवसेनेला संपविण्याचा प्रयत्न केला असे सांगितले. यापुढे महाराष्ट्रात नव्हे तर देशात उद्धव ठाकरे यांची शिवसेना  एक मोठा पक्ष म्हणून उभारी घेईल आणि भाजपालाही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबतच युती करण्याची गरज पडेल असा विश्वास प्रशांत कदम यांनी व्यक्त केला.तसेच भाजपाने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत युती केली नाही तर महाराष्ट्रात भाजपाचे  १२ पेक्षा अधिक खासदार निवडून येणार नाही असा ठाम विश्वास व्यक्त केला. शिवसेनेतून फुटलेले चाळीसही आमदार हे दबावामुळे गेले आहे. ४० आमदारांवर नसल्या तरी त्यापैकी बराच आमदारांवर ईडीच्या कारवाया आहे. भाजपा सोबत गेले की ईडी सीबीआय सारख्या कारवाया थांबतात. आणि त्यामुळे फुटीर गटाने हा पवित्रा घेतला असे सांगून उद्या संजय राऊत भाजपात गेले तर त्यांच्यावर सुरू असलेल्या कारवाया थांबतील असा टोला कदम यांनी लगावला.मग संजय राऊत यांना भाजपात पाठवून सत्य पडताळून पहायला काय हरकत आहे असा प्रश्न पत्रकारांनी केला.यावर प्रशांत कदम यांनी उत्तर देण्याचे टाळले. आदित्य ठाकरे त्यांच्या दौऱ्यात फुटलेल्या शिवसेना आमदारांना राजीनामा देऊन निवडून येण्याचे आवाहन करीत आहे.२०१९ मध्ये निवडून आलेले आमदार भाजपा-सेना युतीमध्ये निवडून आलेले होते. शिवसेना आमदारांना भाजपाची मते मिळाली होती. युतीमध्ये निवडून आले असताना काँग्रेस किंवा राष्ट्रवादीसोबत जाताना शिवसेना आमदारांनी राजीनामे देऊन पुन्हा निवडणूक का लढली नाही ?  असा प्रश्न प्रशांत कदम यांना केला असता त्यावर ते अनुत्तरीत झाले. खासदार नवनीत राणा यांच्या मातोश्री समोरील हनुमान चालीसा पठनावर प्रश्न उपस्थित करून त्यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा कसा काय दाखल झाला. त्यांनी कोणता राष्ट्रद्रोह केला होता. 
तसेच यावरून शिवसेनेने हिंदुत्वाची भूमिका सोडली असे समजायचे का ? या प्रश्नाचे उत्तर देताना खासदार नवनीत राणा यांचा तो स्टंट होता असे सांगून शिवसेनेने हिंदुत्वाचा विचार कधीही सोडलेला नाही व सोडणार नाही असे ठामपणे सांगितले. भविष्यात काँग्रेस किंवा राष्ट्रवादी सोबत जाण्याची गरज पडलीच तरीही वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्र शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला असल्याने शिवसेना ही जागा कधीही सोडणार नाही असे एका प्रश्नाचे उत्तर देतांना कदम म्हणाले.

Comments