नगर परिषदेचा १५५ वा वर्धापन दिन सदभावनेचा संदेश देत साजरा*

*नगर परिषदेचा १५५ वा वर्धापन दिन सदभावनेचा संदेश देत साजरा* 

वरोडा : श्याम ठेंगडी

               सदभावना एकता मंच , सदभावना युवा एकता , गुरुदेव सेवा मंडळ , ऐरबोन मार्शल आर्ट ट्रेनिंग सेंटर , आॕल इंडीया कौमि तंझिम यांच्या संयुक्त विद्यमाने  वरोडा नगर परिषदेच्या १५५ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून सर्वधर्म सामुहिक प्रार्थना व एकशाम शहिदों के नाम या वरोरावासियांना सामाजिक सदभावनेचा संदेश देणा-या एका अभिनव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  
      वरोडा नाक्याजवळील शहीद स्मारक येथे १७ मे रोज मंगळवारला सायंकाळी ७ वाजता हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. येथील उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला उदघाटक म्हणून उपविभागीय पोलिस अधिकारी आयुष नोपाणी  तर प्रमुख अतिथी म्हणून  उपसर्वाधिकारी अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुल आश्रम मोझरी लक्ष्मणराव गमे,  नगर परिषदेचे मुख्याधिकारी व प्रशासक गजानन भोयर , संवर्ग विकास अधिकारी राजेश राठौड , वनपरिक्षेत्र अधिकारी मधुकर राठौड हे उपस्थित होते . 
                 गुरुदेव सेवा मंडळाच्या सामुदायिक प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात नियोजित वेळेवर झाली . लगेचच सर्वधर्मिय प्रार्थना त्या त्या धर्मातिल प्रमुख व्यक्तींकडून घेण्यात आल्या . 
        अध्यक्षीय स्थानावरुन बोलतांना शिंदे म्हणाले की अशाप्रकारच्या आयोजनांची गरज पडू नये पण ती पडते याचा अर्थच असा आहे की कुठेतरी आपण चुकतोय . १५० वर्षांपूर्वी  शहर म्हणून मान्यता मिळालेल्या या शहराचा सांस्कृतिक इतिहास तसा चांगलाच आहे . या वैभवशाली परंपरेला तडा जावू द्यायचा नसेल तर शहराची शांतता सदभावना अबाधित राखण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे .
                  नगर परिषदेचे मुख्याधिकारी गजानन भोयर यांनी या वर्धापन दिनाचे आयोजन हे सामाजिक संघटनांकडून व्हावे ही गोष्ट अतिशय संवेदनशील आहे . या शहराचा सांस्कृतिक वारसा यामुळे लक्षात येतो . वरोडावासियांनी कचरा व्यवस्थापन , पाणी पुरवठा समस्या , वृक्ष लागवड इत्यादी बाबतीत नगर परिषदेला मदत करण्याचे आव्हान करतांनाच हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल आयोजकांचे त्यांनी आभार मानले .
       लक्ष्मणराव गमे यांनी जनतेला दोन्ही वेळच्या सामुदायिक प्रार्थनेचे महत्व समजावून सांगितले . कार्य क्रमाचे प्रास्ताविक छोटूभाऊ शेख यांनी तर सूत्रसंचलन गोपाळ गुडधे यांनी केले . यावेळी आयोजनातील पाचही संघटनेचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते . स्टार ग्रुप वरोडा यांनी देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम सादर केला .

Comments