कारवाई दरम्यान 1,01 करोड रुपयांचा माल जप्त
*जप्त केलेला पोकलैन व चार बोटी घेऊन वाळू तस्कर फरार*
वरोडा: श्याम ठेंगडी
4/5/22
वरोडा शहराजवळून वाहत असलेली जीवनदायी वर्धा नदीच्या करंजी घाटावर हायटेक पध्दतीने होणारी रेतीची तस्करी तहसिलदार रोशन मकवाने केलेल्या कारवाईत समोर आली
तहसिलदार यांच्या चमूने २ मे रोज मंगळवारला केलेल्या कारवाईत १.०१ करोड रुपयांचा माल जप्त करण्यात आला.
चंद्रपूर जिल्हयालगत असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील हे वाळू तस्कर मात्र जप्त केलेली पोकलेन मशिन व चार बोटी घेऊन फरार होण्यात सफल झाले. वरोडा पोलिसांनी आरोपी विरोधात विविध कलमातंर्गत गुन्हा नोंदविला असून आरोपीच्या शोधासाठी यवतमाळ जिल्ह्यात पथक रवाना केले आहे.
तहसिलदार रोशन मकवाने यांना वर्धा नदीच्या करंजी घाटावरून वाळूची अवैध तस्करी होत असल्याची गुप्त माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे २ मेला सायंकाळी ७.१५ ते ८.१५ वाजताच्या दरम्यान तहसिलदार रोशन मकवाने यांनी मंडळ अधिकारी रविंद्र गेडाम, पटवारी सोयाम ,उगलमुले यांचेसह करंजी घाटावर पोहचले असता यवतमाळ जिल्ह्यातील संजय सपाट, प्रवीण महाजन, सुरेश ढाले दोघेही रा. यवतमाळ , सचिन दरणे रा. हिवरा यांचेसह अन्य सात जण या घाटावर वाळूचे उत्खनन करीत असल्याचे आढळून आले.
तहसिलदार यांनी यासंबंधात त्यांना विचारणा केली असता आपण हा घाट लिलावात घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. तेव्हा तहसिलदार यांनी हा घाट चंद्रपूर जिल्ह्यातील वरोडा तहसिलीत येत असल्याची माहिती दिली. तेव्हा घाटावरील साहित्य विना कारवाई देण्याची विनंती केली. परंतु तहसिलदार यांनी जप्तीची कारवाई करत पोकलैन मशिन व चार बोटी वरोडा तहसील कार्यालयात नेण्याची तयारी केली. तेव्हा आरोपींनी राजस्व विभागाच्या पथकाशी धक्काबुक्की करत घाटावरील सर्व सामुग्री घेऊन पसार होण्यात यशस्वी झाले आणि त्यामुळे कारवाई करणारे पथक रिकाम्या हाती परतले.
वरोडा येथे येताच मंडळ अधिकारी रविंद्र गेडाम यांनी वरोडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी विविध कलमाखाली गुन्हा नोंदविला.
बोटीला ट्रकचे इंजिन लावून नदी पात्रातून याव्दारे पाईपमधून पाण्यासह वाळू ओढून किना-यावर जमा केली जात होती. चार बोटीचा उपयोग करून अश्याप्रकारे नदी पात्रातून वाळूचा उपसा करण्यात येत होता. जमा झालेली ही वाळू पोकलैन द्वारे ट्रकमध्ये भरून गंतव्य स्थानी पोहचवली जात होती.
या चार बोटीव्दारे नदीच्या पात्रातून या एका दिवसात अंदाजे २००० ब्रास वाळूची तस्करी करण्यात आली असावी असा संशय आहे . यावरून आतापर्यंत किती मोठ्या प्रमाणात वाळूची तस्करी झाली असावी याचा अंदाज करणे कठीण आहे
येथील पोलिस निरीक्षक दीपक खोब्रागडे यांनी त्वरित गुन्हा नोंदवून उपविभागीय पोलिस अधिकारी आयुष नोपाणी यांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी आयुष नोपाणी यांनी एक पथक तयार करून यवतमाळ जिल्ह्यातील आरोपी व त्यांनी पळवून नेलेली सामुग्री जप्त करण्यासाठी कारवाई सुरू केली आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली वरोडा पोलिस घटनेचा तपास करीत आहे.
Comments
Post a Comment