'माझा वरोरा' स्मरणिकेचे प्रकाशन
वरोडा : श्याम ठेंगडी
वरोडा नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष अहेतेशाम अली यांचा ४९वा वाढदिवस आज मंगळवार २४ मे रोजी भव्य रक्तदान शिबीराने साजरा झाला. नगराध्यक्ष म्हणून मागील पाच वर्षांत केलेल्या विकास कामाचा लेखाजोखा म्हणून " माझा वरोरा " नामक एका स्मरणिकेचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले.
येथील आलिशान सभागृहात झालेल्या या समारंभात लोकशिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. श्रीकांत पाटील यांच्या हस्ते व प्रसिद्ध साहित्यिक ना. गो.थुटे,डाॅ.हेमंत खापने,कृष्णा घड्याळपाटील,रोटरीचे अध्यक्ष हिरालाल बघेले यांच्या उपस्थितीत आज या स्मरणिकेचे प्रकाशन झाले. बाबा भागडे यांनी प्रकाशन सोहळ्याचे संचालन केले.
वरोडा नगरपरिषदेच्या १५० वर्षाच्या इतिहासात अहेतेशाम अली यांच्या कार्यकाळात शहरात मोठ्या प्रमाणात विकासकामे झाल्याने अनेक समस्या मार्गी लागल्या आहेत. शहरात अजूनही ब-याच समस्या आहेत. त्या सोडविण्यासाठी पुन्हा अहेतेशाम अली यांच्या खांद्यावर जनतेने धुरा द्यावी असे आवाहन श्रीकांत पाटील यांनी यावेळी केले.
माजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलेले अर्थ सहाय्य व माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांचे मार्गदर्शन यामुळे आपण शहरासाठी हे कार्य करू शकलो असे मत यावेळी अहेतेशाम अली यांनी व्यक्त केले.
रक्तदान शिबिरामध्ये ११० रक्तदात्यांनी यावेळी रक्तदान केले हे विशेष. रक्तदान शिबिरासाठी नागपूर येथील डॉ. हेडगेवार रक्तपेढीचे शिबिर व्यवस्थापक प्रवीण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कल्पना काळे, शुभांगी नेणारे, प्रिया थुल, तुलसी सहारे व प्रियंका राऊत यांचे सहकार्य मिळाले.
सहकारी बँकेचे संचालक रविंद्र शिंदे,शहरातील तसेच ग्रामीण भागातील विविध संघटनाचे पदाधिकारी , कार्यकर्ते व सर्व स्तरातील नागरिकांनी कार्यक्रमस्थळी येऊन अहेतेशाम अली यांचे अभिनंदन करीत त्यांना शुभेच्छा दिल्या.
Comments
Post a Comment