टेमूर्डा ग्राम पंचायतीचा तुघलकी कारभार*

*टेमूर्डा ग्राम पंचायतीचा तुघलकी कारभार*

बकरी बाजार लिलावात भाग घेण्यासाठी २५ लाखाच्या हैसियतनाम्याची सक्ति

वरोरा
राजेंद्र मर्दाने
 : ग्रामसेवक, सरपंच यांनी संगनमताने कोणत्याही प्रकारची  निवीदा, ई - निविदा प्रकाशित न करता बकरी बाजाराच्या लिलावात सहभागी होण्यासाठी २५ लाखाचा हैसियत नाम्याची सक्ति करुन आपल्या हितचिंतकांना लाभ पोहचविण्याऱ्या टेमुर्डा ग्राम पंचायतीचा तुघलकी कारभार चव्हाट्यावर आला असून वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत या संपूर्ण भोंगळ कारभाराची चौकशी करून संबधित लिलाव प्रक्रिया रद्द करण्याची मागणी  लक्ष्मण बैस याच्या नेतृत्वाखाली गावकऱ्यांनी पत्रकार परिषदेत केली.       
            याविषयी अधिक माहिती देतांना  लक्ष्मण बैस म्हणाले की, तालुक्यातील टेमूर्डा या गावचा बकरी बाजार अख्ख्या महाराष्ट्रच नव्हे तर सीमावर्ती राज्यातही प्रसिद्ध असल्यामुळे मोठ्या संख्येने व्यापारी बकरा -  बकरी खरेदी - विक्री साठी येथे येतात. यासाठी दरवर्षी ग्रामपंचायत तर्फे या बाजाराचा लिलाव होत असतो. यात प्रचंड नफा असल्याने  ग्रामपंचायत तर्फे  ४ मार्च रोजी झालेल्या लिलावामध्ये आर्थिक हितसंबंध गुंतल्यामुळे  पूर्वग्रहदूषित भावनेतूनच इतरांना जाणूनबुजून या लिलावातून डावलून, शासकीय परिपत्रक पायदळी तुडवीत मुदत संपण्यापूर्वीच आपल्या निकटवर्तीयाना मागच्या वर्षीच्या किमतीपेक्षा कमी तसेच शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षाही कमी दरात कंत्राट देण्यात आले आहे. लिलावात अधिक बोली लावणारे लोक असतानाही त्यांना ऐनवेळेस तसीलदाराच्या हैसियतनाम्याच्या मागणीचा तगादा लावून पद्धतशीरपणे दूर ठेवून ग्राम पंचायतचे ग्रामसेवक , सरपंच यांनी आपल्या मर्जीतील केवळ ५ व्यक्तिंना बोली लावण्याचा अधिकार दिला.अशा प्रकारे शासनाची दिशाभूल करून शासनाला लाखों रुपयाचा गंडा घातला आहे. असा आरोपही गावकरी लक्ष्मण बैस यांनी केला आहे. त्यांनी या लिलावावर आक्षेप उचलला असून हा लिलाव नियमबाह्य असल्याचे सांगितले. 
        उल्लेखनीय आहे की, १० लाख रुपयांचे वरील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील व्यवहार ई -  निवेदा पद्धतीने करण्याचा शासन निर्णय आहे. पंरतू  याला पद्धतशीरपणे बगल देण्यात आली. तसेच आवश्यकता नसतानाही २५ लाख रूपयाचा  तहसीलदारांचा हैसियत प्रमाणपत्र जोडण्याची नियम व अट ग्राम पंचायतीने लादली.  या व्यवहारात संगणमत असणाऱ्या व्यापाऱ्यांपैकी अपवाद वगळता इतरांनी तो अर्जासोबत जोडलेला नव्हता. यात फक्त  पाच ठराविक व्यक्तींना बोली बोलण्याचा अधिकार दिला गेला. गुप्त चर्चेत संगनमताने  ठरल्याप्रमाणे यापैकी एका व्यक्तीने १९ लाख ३२ हजार रुपयाची बोली लावली. या रकमेच्यावर कुणीच बोली लावली नसल्याने १९ लाख ३२ हजार रुपयाला बकरी बाजार लिलावात घेतला.  या लिलावातून मलींदा खाण्यासाठीच हैसियत प्रमाणपत्राची सक्ति व ते नसल्याच्या कारणावरून  सर्वसाधारण गावातील लोकांना वगळण्यात आल्याचा आरोप लक्ष्मण बैस यांनी केला आहे.
त्यामुळे ही लिलाव पद्धती चुकीची असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. 
यासंदर्भात वरोरा येथे पत्रकार परिषद घेऊन लक्ष्मण बैस यांनी हा गैरव्यवहार उघडकीस आणला असून यासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन सादर करून न्यायालयात दाद मागणार असल्याचे त्यांनी यावेळी मत व्यक्त केले.

*ग्रामपंचायत येथील सरपंच व ग्रामसेवक यांनी हा लिलाव बरोबर असल्याचा दावा व्यक्त केला आहे.*

या संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन चौकशी करण्याची गरज असल्याचे मत गावकऱ्यांनी व्यक्त केले.

Comments