*भाजपामुळे देशात आणीबाणी सदृश्य स्थिती : खासदार बाळूभाऊ धानोरकर*
चंद्रपूर : संविधान विरोधी सरकार देश चालवित आहे. भाजपाचे विचार, तत्त्वज्ञान हे देशहितविरोधी असून, संविधान संपविण्याचे काम या सरकारकडून सुरू आहे. परंतु, बाबासाहेबांनी दिलेले संविधानच देशाला वाचवू शकते. संविधान आणि देश वाचविण्यासाठी भाजपा सरकारला हद्दपार करणे गरजेचे झाले असून, नागरिकांनी भाजपाला देशातून हद्दपार करण्यासाठी पुढे यावे असे आवाहन राज्याचे महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात यांनी चंद्रपुरात केले.येथील शंकुतला फार्म येथे आयोजित काँग्रेस कार्यकर्ता संवाद मेळाव्यात ते बोलत होते.
खासदार बाळूभाऊ धानोरकर आणि आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या वतीने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्यापूर्वी खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या लोकमान्य टिळक शाळेसमोरील, आकाशवाणी रोडवरील जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन ना. थोरात यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, बहुजन कल्याणमंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार, खासदार बाळू धानोरकर, आमदार सुभाष धोटे, आमदार प्रतिभाताई धानोरकर, आमदार अभिजीत वंजारी, आमदार किशोर जोरगेवार, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे, महासचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस मुन्नाजी ओझा, काँग्रेस प्रदेश महासचिव विनोद दत्तात्रेय, माजी आमदार वामनराव कासावार, माजी आमदार डॉ. अविनाश वारजुकर, माजी आमदार देवराव भांडेकर, काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, शहर जिल्हाध्यक्ष रितेश(रामू ) तिवारी, यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँक अध्यक्ष टिकाराम कोंगरे, माजी जिल्हाध्यक्ष विनायक बांगडे, काँग्रेस युवा नेते शिवा राव आदी उपस्थित होते.
शकुंतला लॉन येथील कार्यकर्ता मेळाव्यात महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात म्हणाले कि, मागील काही निवडणुकांमध्ये काँग्रेसची ताकद वाढल्याचे चित्र आहे. ही ताकद अशीच पुढे वाढवत नेण्याची जबाबदारी कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन पक्षाचे विचार आणि ध्येयधोरणे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन त्यांनी केले. माणसामाणसात भेद निर्माण करून राजकीय पोळी शेकण्याचे काम भारतीय जनता पार्टी करीत आहे. या पक्षापासून नागरिकांनी सावध राहण्याची गरज आहे. पुढील निवडणुकांमध्ये भाजपाला त्यांची जागा दाखवून देण्यासाठी पक्षकार्यकर्त्यांनी कठोर मेहनत घेतल्यास आगामी महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये काँग्रेसला यशापासून कोणीच रोखू शकत नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. राज्यातील शेतकरी, गोरगरीब जनतेच्या विकासासाठी महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आले आहे. मागील दोन वर्षांत कोरोना, अतिवृष्टी, गारपीट अशा संकटाचा सामना करीत सरकारने नागरिकांना धीर दिला आहे. शेतकरी, गरिबांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहण्याचे काम मविआ सरकारने या संकटकाळात केले आहे, असेही ना. थोरात म्हणाले.
ना. विजय वडेट्टीवार म्हणाले, विदर्भ काँग्रेसचा गड होता आणि पुढेही राहणार आहे. आगामी जिल्हा परिषद आणि नगरपंचायात निवडणुकीत काँग्रेसचा झंेडा फडकल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास व्यक्त करीत काँग्रेस कार्यकर्त्यांनी, नगरसेवक, जि.प.सदस्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसचे काम जनतेपर्यंत पोहोचवावे असे आवाहन त्यांनी केले.
खासदार बाळूभाऊ धानोरकर म्हणाले की, भारतीय जनता पार्टीने देशाला आणीबाणीत लोटले आहे. विरोधात बोलणाऱ्यांना केंद्रीय यंत्रणाचा वापर करून खोट्या आरोपाखाली तुरुंगात डांबण्याचे काम केले जात आहे. त्यामुळे भाजपालाही जशास तसे उत्तर देण्यासाठी मविआ सरकारने पावले उचलावीत अशा सूचना त्यांनी ना. थोरात यांच्याकडे केल्या आहेत. मोदी सरकार हे इव्हेंट साजरे करणारे सरकार आहे. ते संकटाचेही इव्हेंट करतात. यापूर्वीही संकटे आली, मोफत लसीकरण झाले. मात्र, काँग्रेसने कधी इव्हेंट केला नाही. मात्र, पंतप्रधान नरेंद मोदी प्रत्येक कार्यक्रमाचे इव्हेंट करीत आहे. जाहिरातबाजीवर मोदीसरकारने तब्बल ४८८० कोटी खर्च केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. बेटी बचाओ, बेटी पढावच्या योजनेतील ७९ टक्के निधीवर मोदी सरकारने डल्ला मारून जाहिरातीवर खर्च केल्याचा आरोप धानोरकर यांनी केला. भाजपाने देशात विद्वेषाचे राजकारण सुरू केले आहे. नेहरू, गांधी, आंबेडकरांच्या स्वप्नातील भारताला तडा देण्याचे मोदी सरकारचे धोरण आहे. भाजपाच्या या विद्वेषाच्या राजकारणाला काँग्रेसच उत्तर देऊ शकते, असेही खासदार बाळूभाऊ धानोरकर यावेळी म्हणाले.
आमदार प्रतिभाताई धानोरकर, आ. सुभाष धोटे, आ. अभिजीत वंजारी, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, वामनराव कासावार, काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनीही यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. कार्यक्रमाला काँग्रेसच्या विविध सेलचे पदाधिकारी, जि.प.सदस्य, नगरसेवक, नगरपांचायत सदस्यांची आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
००००
Comments
Post a Comment