बातमी: चेतन लूतडे
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या प्राथमिक शिक्षण संचालनालयाने खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळांसाठी महत्त्वपूर्ण परिपत्रक जारी करत विद्यार्थ्यांच्या पालकांवरील आर्थिक ताण कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. या परिपत्रकानुसार कोणत्याही शाळेला विद्यार्थ्यांना गणवेश किंवा शैक्षणिक साहित्य विशिष्ट दुकानातून किंवा शाळेतूनच खरेदी करण्याची सक्ती करता येणार नाही.
शासनाच्या ११ जून २००४ च्या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश पुन्हा एकदा देण्यात आले आहेत. यापूर्वीही याबाबत परिपत्रके जारी करण्यात आली होती; मात्र काही ठिकाणी अजूनही सक्ती होत असल्याच्या तक्रारी लक्षात घेता प्रशासनाने हा विषय गंभीरतेने घेतला आहे.
परिपत्रकानुसार, कोणत्याही शाळेने विशिष्ट खाजगी प्रकाशनांची पुस्तके खरेदी करण्यासाठी विद्यार्थ्यांवर बंधन घालू नये. राज्य मंडळ, CBSE, ICSE इत्यादी शाळांनी अनुक्रमे NCERT, SCERT (बालभारती) किंवा संबंधित मंडळांनी मान्य केलेली पाठ्यपुस्तकेच वापरावीत.
तसेच, पालकांकडून तक्रारी प्राप्त झाल्यास संबंधित शिक्षणाधिकारी किंवा प्रशासन अधिकारी यांनी तात्काळ चौकशी करून दोषी शाळांवर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.
या निर्णयामुळे पालकांना दिलासा मिळणार असून शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकता वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
महत्त्वाचे नियम (Rules):
कोणत्याही शाळेला गणवेश विशिष्ट दुकानातूनच खरेदी करण्याची सक्ती करता येणार नाही.
शाळा विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य (पुस्तके, वह्या इ.) ठराविक दुकानातून घेण्यास भाग पाडू शकत नाही.
खाजगी प्रकाशनांची पुस्तके खरेदी करण्यासाठी बंधन घालणे मनाई आहे.
राज्य मंडळ, CBSE, ICSE शाळांनी मान्यताप्राप्त (NCERT / SCERT / संबंधित मंडळ) पाठ्यपुस्तकेच वापरावी.
प्रत्येक शाळा व्यवस्थापन समितीने सक्ती न करण्याचा ठराव घेणे आवश्यक आहे.
तक्रारींसाठी ई-मेल आयडी जाहीर करणे व नोडल अधिकारी नियुक्त करणे बंधनकारक आहे.
नियमांचे उल्लंघन झाल्यास शिक्षण विभागाकडून संबंधित शाळांवर कारवाई केली जाईल.
.....................
Comments
Post a Comment