कत्तलीसाठी नेली जात असलेली ३० जनावरे वाचवली; पोलिसांचा मोठा छापा.
जनावरांची अवैध वाहतूक उधळली, १९.५० लाखांचा मुद्देमाल जप्त
बातमी:chetan lutade,warora/2/5/26
वरोरा (प्रतिनिधी) : वरोरा पोलीसांनी नाईट गस्तीदरम्यान मोठी कारवाई करत ३० गोवंशीय जनावरांची अवैध वाहतूक उधळून लावली असून सुमारे १९ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून इतर साथीदार पसार झाले आहेत.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. १ मे रोजी पहाटे ४.३५ वाजताच्या सुमारास वणी-चंद्रपूर मार्गावरील शेंबळ नाका परिसरात नाकाबंदी करण्यात आली होती. यावेळी नागपूरकडून येणारा आयशर कंटेनर (क्र. HR 55 T 4329) संशयास्पदरीत्या येताना दिसला. पोलिसांनी वाहन थांबविण्याचा इशारा दिल्यानंतर ट्रकमधील दोन इसम उडी मारून झुडपात पळून गेले, तर चालकाला ताब्यात घेण्यात आले.
वाहनाची पंचासमक्ष झडती घेतली असता, ट्रकच्या मागील भागात ३० गोवंशीय बैल अत्यंत दाटीवाटीने, कोणतीही चारा-पाणी व्यवस्था न करता बांधून ठेवलेले आढळले. तसेच वाहतुकीसाठी आवश्यक परवाने व कागदपत्रे नसल्याचेही स्पष्ट झाले. या जनावरांची कत्तलीसाठी अवैध वाहतूक केली जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
या कारवाईत ट्रक (अंदाजे किंमत १५ लाख रुपये) व जनावरे (अंदाजे किंमत ४.५० लाख रुपये) असा एकूण १९.५० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जप्त जनावरांची पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी करून प्राथमिक उपचार करण्यात आले.
या प्रकरणी आरोपी वनवास हेमराज मेश्राम (वय ४२, रा. नागपूर) याच्याविरुद्ध प्राण्यांवरील क्रूरतेस प्रतिबंध अधिनियम १९६० तसेच महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम १९७६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वरोरा पोलीस करत आहेत.
.....
Comments
Post a Comment