-डॉ. प्रविण मुधोळकर
मानवतेच्या इतिहासात आनंदवनाची निर्मिती ही एक आश्चर्य मानले जाते. आमटे कुटुंबीयांनी दिलेल्या आत्मविश्वासामुळे समाजाने नाकारलेल्या कुष्ठबाधितांनी अशा एका सृष्टीची निर्मिती करावी हे कल्पनेपलीकडचे सत्य आहे. 75 वर्षे निरंतर प्रगतीपथावर चालत असलेल्या आनंदवनाच्या निर्मितीमध्ये मातृत्ववादी दृष्टिकोन आणि साधनाताई आमटे यांची महत्त्वाची भूमिका होती. जमीनदारी कुटुंबातून आलेले निग्रही व ध्येयवेडे बाबा तर धार्मिक कुटुंबातून आलेल्या संस्कारशील व अबोल साधनाताई यांचा रंग ,रूप , स्वभाव व सवयी या सर्वच गोष्टींमध्ये अंतर असूनही या दोघांनीही कुष्ठसेवेला आपले जीवन समर्पित केले. नऊ जुलै हा त्यांचा स्मृतिदिवस त्यानिमित्ताने साधनाताईंच्या आठवणींना उजाळा देण्याचा हा प्रयत्न. लग्नानंतर प्रथम वरोरा येथे आल्यानंतर बाबांचे साधनाताईंसोबत प्रथम स्वागत सफाई कामगारांच्या वसाहतीत झाले होते. शास्त्री घराण्यातील संस्कार जपणाऱ्या साधना ताईंचा तो परीक्षेचा क्षण होता. समाजातील वंचितांच्या मनात असलेले बाबांविषयीचे प्रेम पाहून साधनाताईंनी सुद्धा माहेरच्या सोवळे आणि धार्मिक संस्कारांचा त्याग केला. आणि बाबांच्या कार्याला साथ देण्याचा निर्धार केला. बाबांनी आपल्या सेवा कार्याची सुरुवात श्रमाश्रम प्रयोगाद्वारे केली होती. या प्रयोगाच्या दरम्यान साधना ताईंनी बाबासोबत अपार कष्ट सहन केले. बाबांच्या जीवावर बे तनाऱ्या प्रसंगांचा त्यांनी समर्थपणे सामान केला आणि बाबांना त्यांच्या कार्यात साथ दिली. बाबा आणि ताई यांच्या सवयी आणि स्वभावात कमालीचा फरक होता. बाबा कमालीचे नास्तिक तर साधना ताई धार्मिक संस्कारात लक्ष देणाऱ्या होत्या. ज्या वेळी बाबांवर मोठे संकटे यायची त्यावेळी साधनाताई परमेश्वराची पूजा अर्चना करून त्या संकटांना दूर करण्याबाबत प्रार्थना करायच्या. या देवधर्म करण्यामध्ये केवळ कर्मकांड होते असे नव्हे तर त्यांच्या या पूजा अर्चना यामुळे आनंदवनातील कार्यकर्त्यांमध्ये एक सकारात्मक विचारांचे वातावरण तयार होत असे . बाबांच्या कार्यात साधना ताईंनी अनेक भूमिका व जबाबदाऱ्या पार पाडलेल्या आहेत. मोलकरीण , स्वयंपाकीण , व्यवस्थापिका, परिचारिका अशा सर्व भूमिका आनंदाने पार पाडल्या. कुटुंबवत्सल साधनाताई प्रत्येक काम आवडीने करीत असत. दूध काढणे. झाडू बांधणे ,बांबूच्या टोपल्या तयार करणे , मकर संक्रांतीला सर्व कुष्ठमुक्त स्त्रियांना बोलावून हळदीकुंकू आयोजित करणे, त्यांना वाण देणे, त्यांच्या मुला मुलींना स्वतःजवळ ठेवणे अशी अनेक कामे त्यांनी केली. अनाथ मुलांना स्नान घालणं,कपडे घालून देणे, त्यांना औषध व जेवण देणे या सर्व गोष्टी त्या आनंदाने करत असत. आमटे कुटुंबात बाबांचे गृहिणी पण सांभाळणाऱ्या साधना ताईंनी संस्थेच्या अनेक जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडल्या होत्या. त्यांच्या दैनंदिनीमध्ये व्यस्तता असूनही आनंदवनातील सर्वांशी सर्व प्रकारचा संवाद व्हायचा. पाहुणे, कार्यकर्ते , सोमनाथ कॅम्प, मित्र मेळावा , आनंदवनवासी , जर्जर आजारी या सर्वांची चौकशी, चहापाणी ,नाश्ता , भोजन यावर बारीक लक्ष असे .संस्थेच्या सहाय्यक सचिव असल्यामुळे अनेकांचे अर्ज, सहायता , लग्न, सुट्ट्या यासोबतच संस्थेच्या खरेदीच्या पावत्या तपासणे, त्यावर सह्या करणे , काही चुकले असल्यास समजावून सांगणे, लोकांची भांडणे मिटविणे अशी अनेक कार्य त्यांना करावी लागत असे. साधनाताई कोमल स्वभावाच्या असल्या तरी त्या प्रचंड तत्त्ववादी होत्या आणि प्रसंगी कठोर व्हायच्या . अनेकदा त्यांचा महत्त्वाच्या मुद्द्यावर बाबांशी संघर्ष सुद्धा व्हायचा. आनंदवनातील कुष्ठमुक्तांनी विवाह करू नये तसेच त्यांना मुले होऊ नये अशी बाबांची आग्रही भूमिका होती. आणि याला तार्किक आधार सुद्धा होता. बाबांनी कुष्ठरोग्यांप्रती समाजाचा नकारात्मक दृष्टिकोन अनुभवला होता. कुष्ठबाधितांच्या मुलांना सुद्धा हा समाज अशीच वागणूक देईल अशी त्यांना भीती होती. म्हणूनच त्यांनी याबाबत फारच सावधानता बाळगली होती आणि त्याबाबत त्यांनी कठोर नियम देखील केले होते. परंतु साधनाताईंनी याबाबत निग्रही भूमिका घेतली. कुष्ठबाधित लोक सुद्धा माणसेच आहेत. त्यांनाही भावना आहेत, त्यांच्याही गरजा आहेत. त्यामुळे कुष्ठमुक्तांचे विवाह होणे आवश्यक आहे. हे त्यांनी बाबांना पटवून सांगितले आणि तेव्हापासून कुष्ठमुक्त स्त्री-पुरुषांच्या विवाहाला सुरुवात झाली. त्यामुळेच आज आनंदवन हे माणसांनी गजबजलेले दिसते. जर साधना ताईंनी ही भूमिका घेतली नसती तर आज आनंदवनाचे स्वरूप काय असते यावर विचार करावा लागतो. बाबांना देखील साधनाताई एक सक्षम सहचारिणी आहेत याबद्दल विश्वास होता म्हणूनच त्यांनी जीवनात अनेक आव्हाने स्वीकारताना कधीही चिंता केली नाही. नवीन प्रकल्प काढताना हे त्यांनी कधी मागे वळून पाहिले नाही. कारण त्यांच्या मागे साधना ताईच्या रूपात प्रचंड आधार होता. प्रत्येक संकटाच्या वेळी किंवा कुठल्याही नवीन आव्हानाच्या वेळी बाबांना साधनाताई मानसिक आधार देत असत . म्हणूनच त्यांनी स्वतःच्या शरीरावर कुष्ठरोगाचे जंतू टोचून घेताना कुठली चिंता केली नाही कारण पुढे काही झाले तरी साधनाताई त्यांना सांभाळून घेतील असा त्यांना विश्वास होता. आनंदवनात अनेक कुष्ठ मुक्त, दिव्यांग, अंध, मूकबधिर या लोकांचे आंतरजातीय, आंतर विकलांग अशा प्रकारचे विवाह होत असत.त्यांच्या वसाहतीची वैशिष्ट्यपूर्णरचना साधनाताईंनी सांगितली होती . दोन्ही बाजूला दोन दोन जोडपे मध्ये एका खोलीत एक वयस्कर विधवा स्त्री ठेवायची या जोडप्यांची भांडणे झाली तर सदर वयस्कर स्त्रीने कडक सासू व्हायचे व प्रेमाने राहिले तर प्रेमळ आई म्हणून व्हायचे म्हणून त्याचे नाव सुखसदन अर्थात हॅप्पी होम असे ठेवले गेले होते.आणि सर्वात शेवटी भांडणे नाहीच मिटली तर त्यामध्ये साधनाताई लक्ष देऊन अंतिम निर्णय देत असत. अशा प्रकारे या निर्णयाला अंतिम मानले जायचे. ताईंच्या जिव्हाळ्याची रीत न्यारी होती. त्यांच्या वागण्यात प्रेम, कणव, ओलावा आणि आगळी जरब देखील होती. अनेकदा बाबा हे जमदग्नीचा अवतार धारण करीत असत. परंतु त्यांना प्रेमाने सांभाळण्याचे काम साधनाताईंनी केले. त्यामुळेच आनंदवन सातत्याने पुढे जात राहिले आहे. आनंदवन सोबतच इतरही प्रकल्पांवरील लोकांच्या काय गरजा आहेत याबाबत साधनाताई लक्ष घालत असत. अशा प्रकारे साधनाताई या स्वतःचे कुटुंब आणि आनंदवनाच्या महत्त्वाच्या आधारस्तंभ होत्या. गतिशील चक्राला फिरण्यासाठी त्याला एक मजबूत असा आस असावा लागतो हीच भूमिका साधना त्यांची राहिली होती . संपूर्ण जगाला आनंदवनाचा गतिशील प्रवास दिसतो . परंतु त्या सर्वांचा आधार या साधनाताई होत्या. त्यांचे कुटुंब आणि सर्व कार्यकर्ते हे त्यांच्याशी ममत्वाच्या भावनेने जोडलेले होते .साधना ताईंचा हा मातृत्वादृष्टीकोन आनंदवनाच्या पुढच्या पिढीनेही जोपासला आहे. विशेषतः डॉ. विकास आमटे आणि त्यांच्या सहचारिणी डॉ. सौ. भारती आमटे यांनी या मातृत्ववादी दृष्टिकोनाला महत्त्व देत आनंदवनाची गतिशील वाटचाल कायम ठेवलेली आहे. हेच आनंदवनाच्या प्रगतीचे मर्म आहे. आनंदवन आणि आमटे कुटुंबीयांचे कौतुक करत असताना साधनाताईंच्या या गुणवैशिष्ट्यांचे वर्णन कधी होत नाही परंतु आज आनंदवन जे काही आहे त्यामध्ये साधनाताईंचा महत्त्वाचे योगदान आहे त्यांच्या जीवनाच्या समिधा या सेवा योजना समर्पित झाल्यामुळेच आनंदवनाचा सेवायज्ञ सातत्याने धगधगत आहे साधना ताईंचे मोठेपण बाबांना माहीत होते म्हणूनच ते कुठल्याही कार्यक्रमात सर्वप्रथम प्रिय साधना असा उल्लेख करीत आपल्या भाषणाला सुरुवात करीत असत. जगात अनेक स्त्रीवादी दृष्टिकोन आहेत. साधनाताई या भारतीय स्त्रीवादाचे समर्पक असे उदाहरण आहे .2025 हे वर्ष साधनाताई आमटे यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.
Comments
Post a Comment