*जिल्ह्यात उद्योगांना भरारी देण्यासाठी 17431 कोटींची गुंतवणूक*

*जिल्ह्यात उद्योगांना भरारी देण्यासाठी 17431 कोटींची गुंतवणूक*

* 12 कंपन्यांसोबत सामंजस्य करार, 14 हजार थेट रोजगार होणार उपलब्ध*

* डिस्ट्रीक्ट इन्व्हेंस्टमेंट समीट - 2025*

चंद्रपूर, दि. 11 एप्रिल : राज्य शासनाच्या 100 दिवसांच्या कृती कार्यक्रमाचा एक भाग असलेल्या ‘औद्योगिक गुंतवणुकीस पोषक वातावरण निर्मिती’ अंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यात उद्योगांना भरारी देण्यासाठी 12 कंपन्यांसोबत सामंजस्य करार करण्यात आले. या उद्योगातून जिल्ह्यात 17431 कोटींची गुंतवणूक होणार असून त्यातून थेट 14100 रोजगार उपलब्ध होणार आहे.

नियोजन भवन येथे आज (दि.) जिल्हा प्रशासन व जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने डिस्ट्रीक्ट इन्व्हेस्टमेंट समीट – 2025 चे आयोजन करण्यात आले. यावेळी मंचावर आमदार सुधीर मुनगंटीवार, आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, उद्योग विभागाचे सहसंचालक गजेंद्र भारती, मैत्री संस्थेचे नोडल अधिकारी पद्माकर हजारे, बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे संचालक अशोक खडसे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक ऋतुराज सुर्य, विनोद ठोंबरे आदी उपस्थित होते.

यावेळी आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले, महाराष्ट्राच्या उद्योग क्रांतीमध्ये चंद्रपूर जिल्हा अग्रेसर असावा. आज सामंजस्य करार झालेल्या 12 उद्योगांपैकी 7 स्टील उद्योग आहेत. राज्यातील एकूण खनीज संपत्तीपैकी नागपूर विभागात 60 टक्के खनीज आहे, तर नागपूर विभागाच्या एकूण खनीजांपैकी 75 टक्के खनीज संपत्ती चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात आहे. विविध क्षेत्रातील उद्योग चंद्रपुरात यावे, यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे. उद्योगांसाठी जागा, पाणी, व इतर मुलभूत सोयीसुविधा चंद्रपूरमध्ये उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

आमदार किशोर जोरगेवार म्हणाले, चंद्रपूर जिल्हा देशाच्या मध्यभागी असून उद्योगांसाठी वीज, रस्ते, पाणी आणि जमीन येथे मुबलक प्रमाणात आहे. तसेच दळणवळणाच्या उत्तम सोयीसुविधा असल्यामुळे गुंतवणूकदार येथे येतात. जिल्ह्यातील 35 हजार एकर जागा उद्योगांना द्यावी लागणार आहे. सामंजस्य करार झालेल्या उद्योजकांनी चंद्रपूरची निवड करून एक चांगले पाऊल टाकले आहे. येथील गुंतवणुकीमुळे तुमच्या उद्योगाला भरभराटी मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा म्हणाले, सामंजस्य कराराची केवळ सुरूवात आहे. उद्योजकांना जिल्हा प्रशासन पूर्ण सहकार्य करेल. या उद्योगांमुळे जिल्ह्यात रोजगारनिर्मिती होण्यास मदत मिळेल. जिल्ह्यात गुंतवणूकदारांना प्रोत्साहन देणे, त्यांना मुलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देणे, जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करून विकसीत भारत, विकसीत महाराष्ट्रासाठी एक संधी उपलब्ध करून देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयेाजन करण्यात आले आहे. जिल्ह्यात इन्व्हेंस्टमेंट प्रमोशन कमिटी स्थापन करण्यात आली असून या माध्यमातून अडीअडचणी सोडविण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले.

यावेळी जिल्हाधिकारी आणि उद्योजकांचे प्रतिनिधी यांच्यात सामंजस्य करार करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहसंचालक गजेंद्र भारती यांनी केले. संचालक श्याम हेडाऊ यांनी तर आभार महाव्यवस्थापक ऋतुराज सूर्य यांनी मानले.

*सर्वाधिक गुंतवणूक चंद्रपूर जिल्ह्यात :* सामंजस्य करार करण्यात आलेल्या 12 कंपन्यांपैकी 7 उद्योग स्टील क्षेत्राशी संबंधित आहे. तर मायनिंग, बायोफ्यूएल, रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर, डिफेन्स मॅन्युफॅक्चरींग आणि केमिकल टेस्टींग क्षेत्राशी संबंधित प्रत्येकी एक उद्योग आहे. विशेष म्हणजे शासनाने नागपूर विभागाला 14 हजार कोटींचे लक्ष्य दिलेले असताना एकट्या चंद्रपूर जिल्ह्याने 17431 कोटींची गुंतवणूक आकर्षित केली आहे. ही गुंतवणूक यावर्षी आतापर्यंत राज्यात कोणत्याही एका जिल्ह्याने आकर्षित केलेली सर्वाधिक आहे.

 *अशी होणार गुंतवणूक आणि रोजगारक्षमता :* 
1) दिनानाथ अलॉएड स्टील प्रा. लिमिटेड 500 कोटी गुंतवणूक, 700 रोजगार निर्मिती, 
2) डब्ल्यूसीएल भटाडी 729 कोटी गुंतवणूक, 425 रोजगार निर्मिती, 
3)जी. आर. क्रिष्ण फेरो अलॉय प्रा. लिमि 750 कोटी गुंतवणूक, 1000 रोजगार निर्मिती, 
4) भाग्यलक्ष्मी स्पाँज प्रा. लिमि  1053 कोटी गुंतवणूक, 750 रोजगार निर्मिती, 
5) चमन मेटॅलिक लिमि 450 कोटी गुंतवणूक, 650 रोजगार निर्मिती, 
6) गोवा स्पाँज ॲन्ड पॉवर लिमि 2000 कोटी गुंतवणूक, 1500 रोजगार निर्मिती, 
7) कार्निव्हल इंडस्ट्रिज प्रा. लिमि 320 कोटी गुंतवणूक, 550 रोजगार निर्मिती, 
8) पाटील रेल इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लिमि 100 कोटी गुंतवणूक, 250 रोजगार निर्मिती, 
9) ग्रेटा एनर्जी लिमि 10319 कोटी गुंतवणूक, 7000 रोजगार निर्मिती, 
10) डीएनडी एन्टरप्रायजेस प्रा. लिमि  100 कोटी गुंतवणूक, 250 रोजगार निर्मिती, 
11) कालिका स्टील ॲन्ड पॉवर प्रा. लिमि 1100 कोटी गुंतवणूक, 1000 रोजगार निर्मिती, 
12) जेपी असोसिएट्स लेबॉरटरीज 10 कोटींची गुंतवणूक आणि 25 रोजगारनिर्मिती.

०००००

Comments