*सामाजिक एकजूटीसाठी ‘साथी हाथ बढाना’ हा संदेश महत्त्वाचा**आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन**दिव्यांग महिलाश्रय सहकार्याकरिता कार्यक्रमाचे आयोजन*

*सामाजिक एकजूटीसाठी ‘साथी हाथ बढाना’ हा संदेश महत्त्वाचा*

*आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन*

*दिव्यांग महिलाश्रय सहकार्याकरिता कार्यक्रमाचे आयोजन*

*चंद्रपूर, दि. २३ :  महाराष्ट्रात दरवर्षी सुमारे ३२ हजार अपघात होतात, यात १८ ते २० हजार लोक दिव्यांग होतात. मात्र, दिव्यांग होण्यामागे केवळ नैसर्गिक किंवा अपघातजन्य कारणे नाहीत, तर समाजाची उदासीनताही तेवढीच जबाबदार आहे. त्यांचे जीवन संघर्षमय असले तरी ते समाजाला खऱ्या अर्थाने जीवन कसे जगावे, हे शिकवू शकतात. त्यामुळेच सामाजिक एकजूटीसाठी ‘साथी हाथ बढाना’ हा संदेश अधिक महत्त्वाचा ठरतो, असे प्रतिपादन राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.*

प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृह येथे ज्ञानार्चना अपंग स्नेह बहुउद्देशीय संस्था, चंद्रपूर द्वारा दिव्यांग महिलाश्रयाच्या सहकार्याकरिता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी भाजपा महानगराचे जिल्ह्याध्यक्ष राहूल पावडे, ज्ञानार्चना अपंग स्नेह बहुउद्देशीय संस्थेच्या संचालक श्रीमती अर्चना मानलवार, प्रा. डॉ. ज्योती राखुंडे, चंद्रपूर जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी धनंजय साळवे, नागपूरचे खनीकर्म अधिकारी गजानन कांबळे, प्राचार्य जयश्री कापसे गावंडे, सुशीलाबाई मामेडवार आदींची उपस्थिती होती. 

आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, समाजाच्या सकारात्मक सहकार्याने दिव्यांग व्यक्तींना आनंदी आणि सन्मानाने जीवन जगता येऊ शकते. अपघातांमुळे दिव्यांग झालेल्या नागरिकांची जबाबदारी सरकारने घ्यावी, या मागणीसाठी या संदर्भातील अशासकीय विधेयक पुढील विधानसभा अधिवेशनात मांडले जाणार आहे. दिव्यांगांच्या हक्कांसाठी सरकारने दिव्यांग मंत्रालय स्थापन केले असले तरी लोकाश्रय मिळाल्याशिवाय कोणताही प्रश्न सुटणार नाही. श्रीमती अर्चना मानलवार यांनी सर्व दिव्यांग सहकाऱ्यांसोबत भरीव कार्य करण्याचा दृढ संकल्प केला आहे. समाजाने सहकार्य केल्यास दिव्यांगांच्या जीवनात आनंद आणि सन्मान वाढेल, असेही आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी नमूद केले.

Comments