एक वर्षापासून रखडले लेंडी नाल्यावरील पुलाचे बांधकाम *वरोरा-चिकणी मार्गावरील प्रकार *अधिकाऱ्यांवर नियोजन शून्यतेचा आरोप

एक वर्षापासून रखडले लेंडी नाल्यावरील पुलाचे बांधकाम 
*वरोरा-चिकणी मार्गावरील प्रकार 
*अधिकाऱ्यांवर नियोजन शून्यतेचा आरोप

वरोरा : चिकणी ते वरोरा या मार्गावरील दहेगाव नजीकच्या लेंडी नाल्यावरील पुलाचे बांधकाम एक वर्षापासून रखडलेले आहे. अधिकाऱ्यांच्या नियोजन शून्यते मुळे सदर बांधकाम थांबले असल्याचा आरोप या निमित्ताने होत आहे. सदर पुलाच्या अपूर्ण बांधकामामुळे पुराचे पाणी दहेगाव ग्रामस्थांच्या घरामध्ये घुसत असल्याने सदर बांधकाम पावसाळ्याआधी पूर्ण करावे अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

वरोरा ते चिकणी मार्गावरील दहेगाव नजीकच्या लेंडी नाल्यावर अस्तित्वात असलेल्या पुलास बरेच वर्षे झाल्याने त्याची दुरावस्था झाली आहे .तसेच सदर पुलाची उंची कमी असल्याने पावसाळ्यात पूर येऊन वरोरा ते चिकणी मार्ग सतत बंद पडत असतो. यामुळे लेंडी नाल्यावर  नवीन उंच व रुंद आणि मजबूत पुलाचे बांधकाम करण्याचे ठरविण्यात आले. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने निविदा प्रक्रिया पार पाडली. आणि सदर पुलाचे बांधकाम नागपूर येथील एसआ के इन्फ्रा या कंत्राटदार कंपनीला देण्यात आले. अंदाजपत्रकानुसार ३ कोटी ८२ लाख रुपये खर्च अपेक्षित असलेल्या या पुलाच्या कामाचे वर्क ऑर्डर २ फेब्रुवारी २०२२ रोजी एसआरके इन्फ्रा या कंपनीला देण्यात आले. कंपनीला सदर काम डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करणे होते. त्यानुसार कंत्राटदार कंपनीने वर्क ऑर्डर मिळतात बांधकामाला सुरुवात केली. परंतु ८० टक्के काम पूर्ण झाल्यानंतर परंतु मे २०२३ मध्ये कवडू शंकर कोठे या शेतकऱ्याने काम थांबवले. नवीन पूल हा सदर शेतकऱ्याच्या शेतातून जात आहे. त्यासाठी जमीन संपादन करण्याची कार्यवाही पुलाचे बांधकाम सुरू होण्यापूर्वी करण्यात यायला हवी होती. परंतु ती वेळेत करण्यात आली नाही. आणि अधिग्रहित जमिनीचा मोबदला कमी मिळणार असल्याने व अधिग्रहीत जागेत बंडा असताना आणि त्याची नोंद घेण्यात आल्यानंतरही त्याची रक्कम देण्यास प्रशासनाने टाळाटाळ केल्याने शेतकऱ्याने ते काम थांबवले असे म्हटले जाते जाते. दरम्यान पुलाचे काम रखडलेले असल्याने पावसाळ्यात पुराचे पाणी गाव दहेगाव वासियांच्या घरात शिरून मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. यापूर्वी असा प्रकार कधीही घडला नव्हता असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. परिणामी पावसाळ्यापूर्वी या पुलाचे बांधकाम पूर्ण करावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू 

पुलाचे बांधकाम अडवून धरलेल्या शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यात आले असून त्याच्या शेतातील‌ पुलाकरिता संपादित करण्यात आलेल्या जमिनीच्या मोबदल्याची रक्कमआठ महिन्यापूर्वी उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयाकडे जमा करण्यात आली आहे. तसेच शेतात असलेल्या बंड्याची रक्कम सुद्धा त्या शेतकऱ्याला देण्यासाठी प्रयत्नशील असून उपविभागीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून यावर लवकरच तोडगा काढण्याचा प्रयत्न करणार आहे . यामुळेपावसाळ्यापूर्वी पुलाचे बांधकाम पूर्ण होईल असा विश्वास सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता अशोक लोहे यांनी पुण्यनगरीशी बोलताना दिला आहे. तसेच पुलाची जागा का बदलण्यात आली यावर बोलताना त्यांनी आपण त्या वेळेला येथे कार्यरत नव्हतो. त्यावेळच्या अधिकाऱ्यांनी केलेले ते नियोजन होते. आणि मार्गावरील वळण टाळण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी तसे नियोजन केले असावे असे त्यांनी सांगितले.

गाव बंदीचा निर्णय घ्यायचा का?

नवीन पूल बांधकामाचे अधिकाऱ्यांचे नियोजन चुकलेले आहे. वाहतूक वळवून जुना पूल तोडून त्याच ठिकाणी नवीन पुलाचे बांधकाम करायला हवे होते. यामुळे जमीन अधिग्रहणाची कारवाई करण्याची गरज नव्हती. तसेच जुना पूल असताना कितीही पूर आला तरी गावात पाणी जात नव्हते. परंतु नवीन पुलामुळे गावात पाणी घुसत आहे. यामुळे अधिकाऱ्यांचे नियोजन कुठेतरी चुकले‌ असल्याचा आरोप दहेगावचे सरपंच विशाल पारखी यांनी केला आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांची जमीन पुलासाठी घेतली जाणार आहे त्याच्या संपादनाची कारवाई पुलाचे बांधकाम सुरू होण्यापूर्वी नव्हे तर पुलाच्या बांधकामाची निविदा निघण्यापूर्वी होणे अपेक्षित होते. परंतु पुलाचे बांधकाम ६० ते ७०% टक्के पूर्ण झाल्यानंतर ती कार्यवाही सुरू करण्यात आली. हा प्रकार संशयास्पद असून याची चौकशी होण्याची गरज असल्याचे दहेगाव येथील सरपंच विशाल पारखी यांनी म्हटले आहे. तसेच पावसाळ्यापूर्वी पुलाचे बांधकाम पूर्ण होण्याच्या दृष्टीने प्रयत्न‌ झाले नाही तर आम्ही गाव बंदीचा निर्णय घ्यायचा का असा प्रश्न त्यांनी केला आहे.

Comments