*आरोग्यासाठी प्राधान्य कोणास " दवा की दारू " ला*


*आरोग्यासाठी प्राधान्य कोणास " दवा की दारू " ला* जिल्ह्यात मागेल त्याला दारूचे दुकान योजना लागू
 *बॉम्बे नर्सिंग अँड नुसार वरोरा तालुक्यात आठ दवाखान्यांना मान्यता, दवाखाने अद्यावत करण्याची गरज.
 *साथीच्या रोगामुळे दवाखाने हाउसफुल*

वरोरा तालुक्यातील वार्तापत्र १०/oct/23
वरोडा : श्याम ठेंगडी ,संकलन चेतन लूतडे 

        सध्या वरोडा तालुक्यात साथीच्या रोगांनी थैमान घातले असून प्रत्येक कुटुंबाला याचा फटका बसत आहे. वाढलेल्या या साथीच्या रोगामुळे रुग्णावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांवर प्रचंड ताण पडत असला तरी ते अविरतपणे आपली सेवा देत आहेत. एकंदरीत ही परिस्थिती पाहता या साथीच्या रोगाच्या नियंत्रणासाठी वैद्यकीय व्यवस्था अपुरी तर पडत नाही ना असा प्रश्न निर्माण होत असताना दुसरीकडे मात्र तालुक्यात जनतेसाठी मोठ्या प्रमाणात दारू उपलब्ध व्हावी यासाठी प्रयत्न होत असल्याचे दिसत आहे .
            त्यामुळे आता जनतेसमोर दवा की दारू या दोन पर्यायांपैकी कोणा एकाची निवड करावी असा पेच निर्माण झाला आहे.
            सध्या तालुक्यात सर्वत्र साथीचे आजार पसरले असून प्रत्येक कुटुंबात सर्दी, खोकला, डोके व अंगदुखी यासोबत डेंगूसारखेही आजाराचे रुग्ण आढळत आहेत. या रोगापासून सुटका व्हावी यासाठी रूग्ण डॉक्टर कडे धाव घेत असल्याने तालुक्यातील शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातीलही दवाखाने रुग्णांनी ओसंडून वाहत आहेत.
           येथील उपजिल्हा रुग्णालयासोबत तालुक्यातील चार उपचार केंद्रातील स्थितीही याला अपवाद नाही. उपजिल्हा रुग्णालयात दररोज या विविध रोगांचे  हजार ते बाराशे बाह्य रुग्ण तपासणीसाठी येत आहेत. खाजगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांची संख्या ही याव्यतिरिक्त आहे. अशाही अवस्थेत उपजिल्हा रुग्णालयासतील वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत तालुक्यातील सर्व डॉक्टर आपली सेवा अविरतपणे देत आहे हे विशेष.
            या अवस्थेत उद्भवलेल्या या परिस्थितीमुळे खाजगी  डॉक्टरांचा आर्थिक फायदा होत असला तरी सतत्याने ८ ते १० तास रुग्णांना सेवा देत असल्यामुळे त्यांच्यावर प्रचंड शारीरिक व मानसिक ताण येत असल्याचे चित्र दिसते. तर कधी रुग्णांच्या नातेवाईकाच्या रोषाला समोर जावे लागते. 
           वायरल तापाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात रुग्णालयात येत असून यासोबत डेंगू , टायफाईड व मलेरिया या रोगांच्या रुग्णांची यात भर पडत आहे. वातावरणात झालेला बदल सभोवताल असलेल्या उद्योगातून निघणारे प्रदूषित वायू यासोबतच शहरात मोठ्या प्रमाणात होणारी डासांची उत्पत्ती यामुळे हे आजार होत आहेत. एक डेंगू चिकित्सा किट साधारणतः 700 ते 800 रुपयांमध्ये येते. CBC दोनशे ते तीनशे रुपयांमध्ये. आणि डॉक्टरांचे 200 ते 300 रू
यामध्ये औषधी वेगळे असतात.
हा आजार साधारणता एक आठवडा किंवा दोन आठवडे घेऊ शकतो. त्यामुळे रुग्णांची परिस्थिती आर्थिक व मानसिक ढासाळते. 
      या रोगाचे निदान करणारे उपचार हे महागडे असल्याने आणि काही रुग्णांना ते परवडणारे नसल्याने असे रुग्ण हे खाजगी दवाखान्यातून जिल्हा उपजिल्हा रुग्णालयात  उपचारार्थ येत असल्याने उपजिल्हा रुग्णालयावरील ताण वाढला असल्याचे उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर प्रफुल्ल खुजे यांनी सांगितले.
        वरोडा तालुक्यात मुंबई नर्सिंग कायद्यानुसार केवळ आठ खाजगी दवाखान्यांची नोंदणी असून तालुक्यात अंदाजे 60 पदवीधर डॉक्टर कार्यरत असल्याचे मत डॉक्टर असोसिएशन चे अध्यक्ष सागर वजे यांनी व्यक्त केले. हे 60 डॉक्टर आपल्या रुग्णालयात बाह्य रुग्णांची तपासणी करीत त्यांचेवर उपचार करीत आहेत.

     वरोडा येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कार्यालय आहे.या कार्यालयात निरीक्षक विलास थोरात यांचे सोबत २ उपनिरीक्षक,३ हवालदार व एक चालक असा सात जणांचा कर्मचारी वर्ग कार्यरत आहे. या सात कर्मचारी वर्गाच्या कार्यालयाकडे वरोडा,चिमूर, भद्रावती,नागभीड, सावली व  सिंदेवाही या सात तालुक्यांचा कार्यभार आहे हे विशेष.
              या कार्यालयाची साफसफाई करण्यासाठी शासनाने सफाई कर्मचारी देखील उपलब्ध करून दिलेला नाही. राज्य उत्पादन शुल्क विभागाची मान्यता असलेले तालुक्यात दारूचे 80 बार , २ बट्टा व ११ बीअर शाॅपी सुरू असून काही दुकाने मान्यतेसाठी प्रलंबित आहेत.
         चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठल्यानंतर तालुक्यातील बारची संख्या झपाट्याने वाढली असल्याचे चित्र आहे. बार सुरू करताना कोणत्याही किंवा कोणाच्याही ना हरकत प्रमाणपत्राची गरज नसल्याची माहिती दारू उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक विकास थोरात यांनी दिली.

             शासनाच्या या धोरणामुळेच रहिवासी क्षेत्रातही बारची संख्या वाढत आहे.अशा निर्णयामुळे सामाजिक आरोग्य धोक्यात असून जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्याऐवजी त्यांना दारु मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देण्याचे शासनाचे हे धोरण कितपत योग्य ठरू शकते याचा विचार होणे गरजेचे आहे.
      जनतेनेही याचा विचार करणे महत्त्वाचे ठरते आपल्या क्षेत्राच्या विकासात आपलेही योगदान असते हे जनतेला विसरून चालणार नाही. गेल्या लोकसभा निवडणुकीत *दूधवाला की दारूवाला* असा मुद्दा प्रचारात आला असताना, 
जनतेने मात्र दारूवाला यास दिलेली साथ यामुळेच तालुक्यात दारूची दुकाने वाढल्याची चर्चा आता मात्र दबक्या आवाजात होत आहे.
                   एक लाख साठ हजार लोकसंख्या असलेल्या वरोडा तालुक्यात  दारूचे 80 दुकाने, तर बाह्य रुग्ण तपासणी केंद्र(Bombay nursing act ) नुसार केवळ ८ दवाखाने तालुक्यात असावे यासारखी शोकांतिका दुसरी नसावी. खाजगी मध्ये क्लिनिक असले तरीही रात्रीची सेवा फार कमी ठिकाणी मिळते. ग्रामीण भागातील परिस्थिती यावरून अधिक बिकट आहे.

शासनाने नागरीकांच्या आरोग्य व्यवस्थेला प्राधान्यक्रम देऊन त्यांना त्या दृष्टीने सोयी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. जनतेनेही त्या दृष्टीने विचार करून त्यासाठी सहकार्य करणे आवश्यक वाटते.
प्रकाश भाऊ खरवडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

Comments