वेकोलीच्या कोळसा वाहतुकी करीता होत असलेल्या रस्त्या विरुद्ध शिवसेनेची हायकोर्टात धाव

वेकोलीच्या कोळसा वाहतुकी करीता होत असलेल्या रस्त्या विरुद्ध शिवसेनेची हायकोर्टात धाव

* शाळा व शहराला प्रदूषणाचा विळखा बसणार असल्याने घेतला निर्णय 
वरोरा : तालुक्यातील एकोणा कोळसा खाणीतून निघणाऱ्या कोळशाची वाहतूक करण्यासाठी वणी बायपास-वनोजा असा रस्ता तयार केला जात आहे. परंतु सदर भागात शाळा, सभागृह,अनेक लेआउट आणि शहराला पाणीपुरवठा करणारी फिल्टर टॅंक असल्याने कोळसा वाहतुकीमुळे हे सर्व प्रभावित होवून प्रदूषणामध्ये भरमसाठ वाढ होणार आहे.परिणामी याविरुद्ध शिवसेना (ठाकरे) चंद्रपुर जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे यांनी वेकोलीच्या या रस्त्याविरुद्ध उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे.
वरोरा तालुक्यातील एकोणा परिसरात चार वर्षांपूर्वी कोळसा खाण सुरू झाली. परंतु या कोळसा खाणीतून निघणाऱ्या कोळशाची वाहतूक करण्यासाठी वेकोलीने रस्ताच तयार केला नव्हता. ही वाहतूक चक्क वरोरा शहरातून केली जायची. नागरिकांच्या उठावानंतर वेकोलीला जाग आली आणि त्यांनी कोळसा वाहतुकीकरीता पर्यायी रस्ता म्हणून वणी बायपास ते वनोजा असा मार्ग तयार करण्याची योजना आखली. यासाठी त्यांनी पाटबंधारे विकास महामंडळाने १९९९ मध्ये निप्पॉन डेंड्रो प्रकल्पाकरिता खरेदी केलेल्या जागेचा वापर करण्याचा निर्णय घेऊन ती जागा त्यांनी खरेदी केली. महत्त्वाचे म्हणजे निपॉन डेंड्रो करिता शेतकऱ्यांकडून पाईपलाईन टाकण्याकरिता अत्यंत कमी दरात ही जागा खरेदी करण्यात आली होती. व ती ५.४२ कोटी रुपयात  विकली आहे. पाईपलाईन ही भूगर्भातून जाणार होती. त्यामुळे त्यावरची जागा संबंधित शेतकऱ्यांनाच वापरता येणार होती. परंतु तो प्रकल्प रद्द झाला. यानंतर १९९९ ते २०२२ पर्यंत याभागात  शाळा, सभागृह आणि अनेक लेआउट झाले. सदर लेआउटला खुद्द पाटबंधारे विभागानेही नाहरकत तर जिल्हा अधिकाऱ्यांनी परवानगी दिली आणि आता तीच जागा वेकोलीला दिल्याने वाद निर्माण झाला आहे. या रस्त्याच्या मार्गावर वरोरा शहराला पाणीपुरवठा करणारी फिल्टर टॅंक देखील आहे. कोणत्याही खाण प्रकल्पाचे उत्खनन हे नागरी वस्ती तसेच रस्ते या पासून ५०० मीटर दूर अंतरावर असायला हवे असा नियम आहे. परंतु एकोणा कोळसा खाणीने या नियमाचे सरसकट उल्लंघन केल्याचे दिसून येते.
  वेकोली कोळसा वाहतुकीसाठी तयार करीत असलेल्या रस्ता परिसरातून वणी बायपास ते वनोजा गणपती मंदिर असा सार्वजनिक बांधकाम विभागाचा बायपास मार्ग निघणार होता. त्याचे भूमिपूजन तत्कालीन पालकमंत्री संजय देवतळे यांच्या हस्ते झाले होते. हा रस्त्याचा उत्तम पर्याय असताना वेकोलीने नवीन जागेतुन रस्ता तयार करण्याचा निर्णय घेऊन शहराला प्रदूषणाच्या विळख्यात ढकलले असल्याचा आरोप होत आहे. कोळसा वाहतुकीमुळे होणाऱ्या प्रदूषणाने परिसरात असलेल्या संस्कार भारती पब्लिक स्कूल या शाळेतील विद्यार्थ्यांसह नागरिकांचे आरोग्य देखील धोक्यात येणार आहे. यामुळे वेकोली कोळसा वाहतुकी करीता तयार करीत असलेल्या रस्त्या विरुद्ध  संस्कार  भारती पब्लिक स्कूल मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या काही पालकांनी केलेल्या विनंतीवरून शिवसेनेचे चंद्रपूर जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. या याचिकेत त्यांनी सदर रस्त्याचे काम बंद करण्याची व पर्यायी रस्ता दुसऱ्या बाजूने वळवण्याची मागणी केली आहे. सदर रस्ता हा संस्कार भारती पब्लिक स्कूल या शाळेच्या प्रवेशद्वारापासून जात असल्याने प्रवेशद्वार बंद होणार असून कोळसा वाहतुकीमुळे होणाऱ्या धुळीने शाळेतील विद्यार्थ्यांचे आरोग्य सुद्धा धोक्यात येणार आहे. त्यामुळे सदर रस्ता हा शाळेच्या मागच्या बाजूने काढला जावा आणि त्यासाठी आवश्यक पडल्यास जागा देण्याची तयारी देखील शाळेच्या संचालकांनी दर्शवलेली असल्याचे मुकेश जिवतोडे यांनी म्हटले आहे.

Comments