रेशीम शेती" उद्योगातून वर्षाकाठी पाच लाखांपेक्षा अधिकचे उत्पन्न *मजरा (रै) येथील ध्येयवेढ्या युवा शेतकऱ्याचा पराक्रम

"रेशीम शेती" उद्योगातून वर्षाकाठी पाच लाखांपेक्षा अधिकचे उत्पन्न 
 *मजरा (रै) येथील ध्येयवेढ्या युवा शेतकऱ्याचा पराक्रम
 
वरोरा : पारंपारिक शेत पिकांसह शेतीमध्ये काहीतरी नाविन्यपूर्ण जोडधंदा उभारून उत्पन्न वाढविण्याचा दृढनिश्चय करून तशी  खूणगाठ बांधलेल्या तालुक्यातील मजरा (रै) येथील युवा शेतकऱ्याने अवघ्या दीड एकर शेतात रेशीम उद्योग साकारला आहे. या उद्योगातून तो वर्षाकाठी पाच लाख रुपयांपेक्षा अधिकचे उत्पन्न मिळवत आहेत. यासाठी त्याने मनरेगाची योजना जिल्ह्यात खेचून आणली असून त्याचा चंद्रपूर जिल्ह्यात प्रथम लाभ मुजरा(रै) ग्रामपंचायतला मिळवून दिला आहे.

 वरोरा तालुक्यातील मजरा(रै) येथील विजय मधुकर क्षिरसागर ३० वर्ष यांची सर्वे नंबर ६० मध्ये वडिलोपार्जित दहा एकर शेतजमीन आहे. या शेतीत कापूस, तूर,सोयाबीन,चना,गहू ही पारंपारिक पिके घेतली जायची. परंतु त्यातून फारसे उत्पन्न मिळत नव्हते. यामुळे विजयने शेतीमध्ये पारंपारिक पिकांबरोबरच काहीतरी नवीन प्रयोग करून वेगळा पूरक जोडधंदा उभारून उत्पन्न वाढीचे प्रयत्न करीत होता. आणि त्या दिशेने त्याने पावले उचलले. त्यांचे शिक्षण रेशम क्षेत्रात झाले असून  रेशीम शेती उद्योगाची माहिती   मिळाल्यानंतर त्याने वर्धा, यवतमाळ अशा विविध जिल्ह्यातील रेशीम उद्योग शेतीला भेटी दिल्या व माहिती घेतली. त्यानंतर2018साली  त्याने स्वतःच्या शेतात रेशीम शेती उद्योग करण्याचे ठरवले. त्यासाठी त्याने कृषी अधिकाऱ्यांच्या मदतीने जिल्हा रेशीम कार्यालय  चंद्रपूर यांच्या माध्यमातून वर्ष २०१८ मध्ये सदर व्यवसायाचे मैसूर येथे पंधरा दिवसाचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी स्वतः च्या शेतात शेड बांधून जिल्हा रेशीम कार्यालय चंद्रपूरच्या माध्यमातून रेशीम कीटक संगोपन गृह वर्धा यांच्याकडे संपर्क साधला व रेशीम कीड आणि त्यांचे खाद्य असलेली तूती रोपे खरेदी केली.

 अठ्ठावीस दिवसांच्या तिसऱ्या अवस्थेनंतर रेशीम अळ्यांनी कोष तयार केली. या अळ्यांना तुतीच्या झाडांची पाने खाद्य म्हणून द्यावे लागते या खाद्याच्या उपलब्धतेवर रेशीम उद्योगाचा विस्तार ठरलेला असतो. रेशीम अळी कडून कोष तयार करायला सुरुवात होताना त्यावर चंद्रिका जाळी टाकली जाते. त्यामुळे कोष व्यवस्थित तयार होतो. पूर्ण कोष तयार झाल्यानंतर तो सिकंदराबाद, जालना, पूर्णा,बडनेरा येथील बाजारपेठेत नेऊन विकला जातो असे विजय सांगतो. या कोषला प्रति क्विंटल ५५००० ते ६०००० रुपये दर मिळतो.एका महिन्यात तयार होणाऱ्या बॅचमध्ये साधारणतः एक क्विंटल पेक्षाही अधिक कोष विजय यांच्याकडे तयार होत असतो. तसेच अळ्यांची विष्ठा शेतात खत म्हणून वापरली जाते. अशाप्रकारे वर्षाकाठी पाच बॅच मिळून पाच लाखांपेक्षा अधिकचे उत्पन्न २०१९ पासून विजय घेत आहे. दृढनिश्चय, जिद्द आणि चिकाटीने सकारात्मक दृष्टिकोन ठेवून एखादे काम केले तर काय होऊ शकते हे या माध्यमातून विजय क्षिरसागर यांनी दाखवून दिले असून तो युवा शेतकऱ्यांसाठी आदर्श व आशेचा किरण ठरला आहे.

Comments