टेमुर्डा ग्रामपंचायतीच्या बकरी बाजार व आठवडी बाजाराचा 20 मार्च रोजी लिलाव.
टेमुर्डा : येथील ग्रामपंचायत हद्दीतील बकरी बाजार व आठवडी बाजार (भाजीपाला व इतर) यांच्या आगामी २०२६-२७ या वर्षासाठी जाहीर लिलावाची प्रक्रिया पार पडणार आहे. हा लिलाव मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ च्या कलम १२६ अन्वये ग्रामपंचायत सभागृह, टेमुर्डा येथे दिनांक 20 मार्च २०२६, शुक्रवार रोजी सकाळी ११.०० वाजता होणार आहे.
ग्रामपंचायत प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, सन २०२६-२०२७ (दि. १ एप्रिल २०२६ ते ३१ मार्च २०२७) या कालावधीसाठी हे बाजार ठेक्याने देण्यात येणार आहेत. लिलाव प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या इच्छुक ठेकेदारांना काही महत्त्वाच्या अटी व शर्ती पूर्ण कराव्या लागणार आहेत.
लिलाव प्रक्रिया व अनामत रक्कम :
लिलावाच्या दिवशी सकाळी ११.०० ते ११.३० या वेळेत इच्छुक बोलीदारांची अनामत रक्कम स्वीकारली जाईल. त्यानंतर सकाळी ११.३० वाजता प्रथम बकरी बाजाराच्या लिलावास सुरुवात होईल. बकरी बाजार लिलावाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आठवडी बाजार (भाजीपाला व इतर) यासाठी लिलाव घेण्यात येईल.
लिलावात सहभागी होण्यासाठी बकरी बाजारकरिता ५०,०००/- रुपये (पन्नास हजार) व आठवडी बाजारकरिता २०,०००/- रुपये (वीस हजार) अनामत रक्कम ग्रामपंचायत कार्यालयात जमा करणे अनिवार्य आहे. याशिवाय, ठेकेदारांना आपली आर्थिक क्षमता सिद्ध करण्यासाठी संबंधित तहसीलदार यांचे हैसियत प्रमाणपत्र सादर करावे लागेल. बकरी बाजारासाठी १०,००,०००/- रुपये (दहा लाख) व आठवडी बाजारासाठी ५,००,०००/- रुपये (पाच लाख) किमतीचे हे प्रमाणपत्र दिनांक १ जानेवारी २०२६ नंतर काढलेले असणे आवश्यक आहे.
लिलावाच्या अटी व शर्ती :
या लिलावात सहभागी होणाऱ्या व्यक्तीच्या नावे ग्रामपंचायतीची कोणतीही कराची थकबाकी नसावी. तसेच, मागील बाजार ठेक्याची थकबाकी असेल तर अशा ठेकेदारांची अनामत रक्कम स्वीकारली जाणार नाही. बोली बोलताना बकरी बाजारासाठी १,०००/- रुपयांच्या फरकाने तर आठवडी बाजारासाठी ५००/- रुपयांच्या फरकाने बोली बोलावी लागेल. लिलाव फक्त तीन बोलींवर देण्यात येईल.
ज्या बोलीदाराच्या नावे अंतिम बोली निश्चित होईल, त्याला त्वरित ठेक्याच्या रकमेपैकी ५० टक्के रक्कम रोख स्वरूपात जमा करावी लागेल. उर्वरित रक्कम दि. १ ऑगस्ट २०२६ व दि. २९ नोव्हेंबर २०२६ अशा दोन हप्त्यांमध्ये, राष्ट्रीयकृत बँकेच्या रेखांकित धनादेशाद्वारे ग्रामपंचायतीकडे जमा करणे बंधनकारक असेल.
ठेक्याच्या अटी :
ठेकेदाराने ३१ मार्च २०२६ पूर्वी ५००/- रुपयांच्या स्टॅम्पपेपरवर साक्षीदारांसमक्ष करारनामा करून देणे आवश्यक आहे. त्यानंतरच बाजार वसुलीचा परवाना देण्यात येईल. ग्रामपंचायतीने ठरवून दिलेल्या दरापेक्षा जादा दराने बळजबरीने वसुली केल्यास किंवा गुंडागर्दी केल्याचे आढळल्यास, कोणतीही पूर्वसूचना न देता ठेका रद्द करण्यात येईल. तसेच, बाजार वसुलीसाठी लागणारी रजिस्ट्रे व बिल बुके ही केवळ ग्रामपंचायत कार्यालयातूनच घ्यावी लागतील.
हा लिलाव रद्द करण्याचा किंवा त्यात कोणताही फेरबदल करण्याचा संपूर्ण अधिकार प्रशासन ग्रामपंचायत टेमुर्डा यांच्याकडे राहील, असे सरपंच श्रीमती सुविता ठाकरे, उपसरपंच श्रीमती विमल वाटोरे व ग्रामविकास अधिकारी श्री पी. एल. बोरचाटे यांनी काढलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे.
इच्छुक ठेकेदारांनी वरील सर्व अटी व शर्ती लक्षात घेऊन लिलाव प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन ग्रामपंचायत प्रशासनाने केले आहे.
.......
Comments
Post a Comment